Monday, 8 July 2019

प्रिय

प्रिय
त्या कोणासाठीतरी ज्याच्यासाठी मी नवसाची ओढणी बांधून ठेवली होती,

मी त्याला शोधत राहिले रे universe, कधीच न थांबणारा शोध. कधी न संपणारा शोध, वेड लावणारा शोध...
"कोण जाणे मी होतो काय? कोण जाणे मी आहे काय?" या दहावी फ तल्या सरांच्या प्रश्नाबरोबर वाहत राहिले.
स्वतःला सांगत राहिले "जिंदा हूँ यार, काफी हैं" आणि तरीही जिवंत असण्याचं कारण शोधात राहिले.
विचारांच्या आवर्तात गुंतवून टाकून माणसाचं बाहुलं बनवणारं ruminative thinking हि करत राहिले.
मी श्वासही घेत राहिले आणि उच्छवास सोडतही राहिले.
romanticism नाही सुटला अजिबात. तो दडवत राहिले रुक्ष वास्तववादाच्या पाठी. माझा romanticism वेडा ठरला.
तुला माहित्येय सगळं करूनही अडकणं थांबलं नाही. अपेक्षा थांबल्या नाहीत.
मी स्वतःला सांगत राहिले कि मला trust issues आहेत आणि तरीही विश्वास टाकणं थांबलं नाही.
आपलं म्हणणं थांबलं नाही.
पण ग्यानबाची मेख वेगळीच होती. कारण मी वेगळी नव्हते आणि तरीही वेगळी होते.
मला दुसऱ्यांच्या पायातील काटे त्यांच्या मार्गातून काढून स्वतःच्या वाटेवर पसरायची फार फार घाई होती. मला स्वतःला इतकं टोचून घ्यायचं होतं कि मला त्यानंतर दुःख होणं, वेदना होणं बंद झालं असतं पण तसं व्हायचं नसावं कदाचित.
मी कोणाचंच काहीही भलं करू शकत नव्हते.
मी होते आणि मी नव्हते.
भरभरून बोलणाऱ्या मला माझ्या आतला काळोख ओतायला कवितेचं पातेलं शोधावं लागत होतं एकदा ओतलेला काळोख पुन्हा पुन्हा दाटायचा आणि प्रत्येक वेळी नवीन पातेलं शोधत फिरावं लागे. पर्याय नव्हता.
मी जळत होते तरी संपत नव्हते.
का? मी संपत का नाही? माझ्याबरोबर हे सगळं संपेल अशी भाबडी आशा होती मला. पण ती कधीच फळली नाही.
मी श्वास घेत राहिले. कंटाळले. थकले. वैतागले. विटले. पण श्वास घेणं संपलं नाही.
आणि असं का याचं उत्तर मला सापडलं नाही.
खूप जणांना खूप काही करायचं असतं. मला निश्चिन्तपणे मोडून पडायचं होतं. मला त्या काळोखाचा थांग गाठायचा होता. मला सगळे काटे टोचून घ्यायचे होते.
 मला वेदना आवडायची. अजूनही आवडते. मला ती आपली वाटायची. तिच्यात एक प्रकारची माया होती. सुखाला आणि सौख्याला पीळ नसायचे. वेदना घट्ट असायची. आपली आपण. एकटी. नवसाची ओढणी बांधलेली. सगळ्या ओढण्यांबरोबर तरीही एकटी. तिच्या एकटेपणात सामर्थ्य होतं. शक्ती होती. पण तिला असं होणं भाग होतं. ती तुटली पार तर तिनेच उठावं असा संकेत होता.
ती कोणाला नको होती. कुंतीशिवाय.
कृष्ण जवळ असावा म्हणून का होईना तिने वेदना मागितली होती.
कुठल्याही बाबतीत मला कधीही न पटलेली कुंती इथे मात्र निश्चित पटली होती.
Happily ever after वेडेपणाच होता. आणि नव्हताही.
म्हणजे वेदना जितकी सुखावते तितकं कदाचित काहीच सुखावत नाही.
म्हणून मी वेदनेतून, अश्रूंतून तुला लिहीत राहिले.
वेदनेच खत पीक दिल्याशिवाय जाईल कसं? तिच्या जीवावर तर romanticism जिवंत राहिला. idealism ने गुलज़ार चा पत्ता शोधला. वास्तववादाने passenger चं बोट धरलं आणि सामाजिक मुखवट्याने शास्त्रीय संगीतात खरेपणा ढुंढाळला.
मी श्वास घेत राहिले.
श्वास घेण्याची गरज, कारण काहीच नसताना.
मी मेले नाही.
पण मी जगलेही नाही.
मी हिंदकळत राहिले मधल्या शांततेत.
श्वास घेतल्यानंतरच्या आणि श्वास सोडण्याआधीच्या.
पण या व्यापाराने मी तुझ्या खूप जवळ आले.
universe काय रे हे अरण्यरुदन.
कोणासाठी बांधली रे हि ओढणी.
कसला रे नवस?
काय हा भ्रम?
कोण मी?
कोण तू?
कोणाला मायना लिहू?
कोणाचा निरोप घेऊ?
श्वास घेते.
श्वास सोडते.

तुझी न माझी,
तू न मी

ता. क. व्याख्येची व्याख्या आणि मनातलं मन... वलय, चक्र, आवर्त, शुद्ध मी पण!!!