Thursday, 27 October 2016

सीता : मला कायम छळणारं एक अस्तित्व

खूप प्रश्न पडतात कधीकधी.

उत्तरही अगदी मिळत नाहीतच असं काही नाही.

पण गोंधळ उडतो.

सीता! हे दोन अक्षरी नाव जितके प्रश्न उपस्थित करतं तितके प्रश्न उपस्थित करण्याचं सामर्थ्य खचितच दुसऱ्या कुठल्याही नावात असेल. तिचं सगळं असणंच एक मोठा प्रश्न आहे असं वाटल्यावाचून राहत नाही.

तिचं स्वयंवर रचून वाल्मिकींनी तिच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची मुहूर्तमेढच रोवली जणू.

त्यानंतर तिचा नवऱ्याबरोबरचा वनवासाचा निर्णय पुन्हा एकदा अधोरेखित करतो कि ती कशालाच घाबरत नव्हती. तिचं सोन्याच्या लंकेत अशोक वाटिकेत राहणं दाखवून जातं कि तिला आयुष्याकडून संपत्ती नव्हे तर शांतीची अपेक्षा होती.

तिचं अग्निदिव्य हा कायमच एक चर्चेचा विषय असतो स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेणाऱ्यांचा तर विशेषतः. स्वतःवर प्रचंड विश्वास असलेली स्त्रीच हे करू शकते.

मी स्वतः अनेक वर्ष वाल्मिकींना दोष दिला कि त्यांनी रामाकडून अशा अग्निदिव्याची साक्ष का नाही मागितली. सीतेच्या प्रेमाला ज्या अग्निदिव्याची गरज नव्हती त्याची कोत्या आणि संकुचित मनाच्या पुरुषप्रधान समाजाला एका स्त्रीकडून होती हे एवढं साधं आहे त्याचा उत्तर.

आजही बलात्कार झाल्यावर आपण म्हणतो कि "ती"चं आयुष्य उध्वस्त झालं. "त्या"ला कितीही शिक्षा झाली तरी त्याचं सहज लग्न होतं आणि "तो" वावरतोही समाजात उजळ माथ्याने. "ती" मात्र कायम कलंकित. का?
आणि जसं बलात्कार झाल्यावर त्यासाठी न्याय मागण्याच्या प्रक्रियेत आणि नंतर एकूणच सामान्य आयुष्य जगण्यात बाईचा पुन्हा पुन्हा बलात्कार होतो आणि तिला अग्निदिव्य करतंच जगावं लागतं अगदी तसंच सीतेला पुन्हा वनवास भोगावा लागतो.

राम तर खेळणं वाटतो मला ह्या सगळ्यात. म्हणजे त्याच्या इच्छेला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला काही अर्थच नाहीये. आणि तोही भरकटल्यासारखा समाजनियम, लोकापवाद, रीतिरिवाज, परंपरा यात वाहवत जातो. तिथे आणि केवळ तिथेच चुकतो तो. त्याला जे हवंय त्यासाठी निदान त्यासाठी तरी त्याने लढायला हवं होतं असं वाटत राहतं.

काय करुण दुःख रंगावलंय वाल्मिकींनी. ती आई होते आणि आपलं प्रेम निभावते आणि तो दुसरं लग्न करणं नाकारतो.

एवढा शक्तिशाली राजा तो आणि हतबल. याउलट "जी" ला "अबला" म्हणतात ती "ती" मात्र इतकी सक्षम.

एकदा पत्नी म्हणून आणि एकदा स्त्री म्हणून वनवास काय स्वीकारते. एकटी आई म्हणून खंबीरपणे उभी काय राहते. स्वतःच्या स्वाभिमानासाठी परत जाणं काय नाकारते.

वाल्मिकी वर्षोनुवर्ष ओरडताहेत कि "ती" अबला नाही आणि "तो" दिसतो तितका सबळ नाही. रामराज्य अजिबात छान नव्हतं आणि ते परत घडू नये हेच बरं.

आपण मात्र चुकीची री ओढत जगतोय.

जगतोय का काय करतोय तो रामच जाणे!

त्याचा विरह जास्त एकटा (भावना व्यक्त करायची मनाई म्हणून) असूनही समाज त्याला भावना होत्या हे अमान्य करत गाणी मात्र कायम तिच्या ओठीच विरहगीतं गात राहणार. हाय रे दुर्दैव!

विविध अंगांनी आत्ता असलेली स्त्री-पुरुष विषमता सरून कधीतरी मानव्याचा विजय होईल का?

हा नरकासुर संपेल, तेव्हा वाल्मिकींची खरी दिवाळी उजाडेल.

No comments:

Post a Comment