Wednesday, 2 October 2019

मार्ग

कुठे काय या वेडीचं राहिलं होतं? सगळं सगळं तर तिने वाहून टाकलं होतं. आता ती कोणाला विचारणार होती? आणि काय?

तिचं असं फक्त वाटणं होतं. निरंतर तिच्यापाशी असलेलं. तिच्यापासून कधीच कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही असं. तिला जे वाटणार होतं ते तिची साथ कशी सोडेल? ते तिचं हक्काचं होतं. तिचं एकटं असणं. आता त्या एकटेपणाला तिच्या अस्तित्वाची सवय झाली होती. तिचं सगळ्यांशी असलेलं नातं संपू शकलं असतंही कदाचित. पण तिचं तिच्याशी जुळलेलं नातं अबाधित होतं. सगळ्या कोलाहलात आतून तिच्या भावनांचा येणारा आवाज कितीही अस्पष्ट असला तरी तो तिच्या कर्णपटलांवर आदळतंच राहणार होता. तिने तो ऐकणं सोडून देईपर्यंत. अखंड. किती मोठं सुख होतं हे. कधीही एकटं न पडण्याचं.

पण आत्ता तिचे डोळे भरून वाहत होते. तिला तिच्यापर्यंत पोचायला किती वेळ लागला होता. तिला समजत होतं कि तो प्रवास महत्वाचा होता. आता ती कधीच तिच्या मर्यादांना घाबरणार नव्हती. कारण तिच्या मर्यादा तिला बांधून ठेवू शकत नव्हत्या. तरीही ती का रडत होती? कारण तिच्या आतल्या जगाने बाहेरच्या जगावर मात केली होती. तिचं स्वत्व आणि सत्व जिंकलं होतं. ज्याचं तिला बंधन वाटत होतं त्याच्याशी तिने मैत्री केली होती. जे संदर्भ तिला मान्य नव्हते त्या संदर्भांसाठी तिने स्वतःचे नवीन अर्थ शोधून काढले होते. तिला उमजलं होतं कि ज्याच्याशी भांडता येत नाही त्याला ओलांडून पुढे जाण्यात शहाणपण आहे. ते स्वीकारणं गरजेचं नाही.

ती अडकली होती. जे जुनं आहे ते फार लांबण लावल्यागत अडक-साखळी सारखं वाटत होतं आणि जे नवीन आहे ते शुष्क आणि रुक्ष वाटत होतं. जे जुनं होतं ते कधीच संपलं होतं. त्याचं शव ओढत राहण्यात दुर्गंधी वाढण्याव्यतिरिक्त काहीच हशील नव्हतं. पण मग नवं तरी त्याचा पर्याय होऊ शकलं असतं का? नाही. या तथाकथित नव्याचा जन्म जुन्याला काटशह देण्यासाठी झाला होता. खरोखरीच नावीन्यपूर्ण अर्थवाही वीण घालायची म्हणून नव्हे. ती पेचात सापडली होती. तिने करावं तरी काय.

कर्मापासून सुटका नव्हती. प्रचलित कर्माचे जुने-नवे मार्ग मान्य नव्हते. पटत नव्हते आणि रुचत तर मुळीच नव्हते.

मग तिला जाणवलं कि ती तिचा मार्ग निवडायला मोकळी होती. जसं आतलं अस्तिव केवळ तिचं होतं तसंच तिचं कर्मही केवळ तिचं होतं. ब्रह्माण्डाने परत तिचा मार्ग प्रशस्त केला होता. तिचं कर्म आणि त्यामागची भावना केवळ तिची होती. तिला संधी होती या आतल्या आंदोलनांचा कर्माशी योग्य साधायची. जुन्याच्या रुढिवादात आणि नव्याच्या क्रांतिवादात ती पाण्याचा मार्ग अवलंबणार होती. क्रांती आणि रूढींना बगल देत कर्म आणि निष्ठा यांच्याशी सलगी करणं तिने तिच्यासाठी निवडलं होतं.

आणि या निवडीतून तिला जे मिळालं होतं त्याची जाणीव केवळ त्या परशक्तीच्या साम्राज्याला ब्रह्माण्डला होती.

ती मुक्त होती. स्वतंत्र होती. ती ती होती.   

No comments:

Post a Comment